सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!


सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!




या खेळाडूने आपल्या अद्भुत फलंदाजीने जगातील प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळा अधिराज्य गाजवले.अनेकांना त्याच्या खेळातून प्रेरणा मिळाली.अनेक खेळाडू जे नंतरच्या काळात चांगले नावलौकिक मिळवते झाले त्यापैकी बरेच जण सचिनलाच आपला आदर्श मानतात.ज्याला बघत प्रेरणा घेत जे खेळाडू मोठे झाले व त्याच्यासोबतच खेळण्याचे भाग्य काहींना लाभले.अनेक मध्यमवर्गीय पालकांवर सुद्धा सचिनने मोहिनी घातली.किंबहुना मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षांचे सचिन तेंडूलकर हा प्रतिकच बनला होता.
 एका मध्यमवर्गीय कुटुंबांतून येऊन जगाच्या व्यासपीठावर आपले नाणे खणखणीत वाजवणारा...नव्हे तर आपल्या तालावर नाचायला लावणारा...
मला सुद्धा शालेय जीवनात सचिन जीवनापासूनच आवडायला लागला.खरेतर मला आणि माझ्यासारख्या असंख्य मुलांना अभ्यासावरुन लक्ष हटविण्यात सचिनचा खूप मोठा हात होता.आणि माझ्या या मताशी तर अनेक पालक सहमत असतील.क्रिकेटशी माझी नाळ विशेषतः सचिनच्या फलंदाजीशी जोडली गेली होती.मी सातवीत असताना वेस्टइंडीज १९९४ च्या भारत दौर्यावर आली असताना नागपूर कसोटीत सचिन फलंदाजीला आला असताना माझे मन शाळेत जायला तयार होईना.पण घरी राह्यलो तर मार खावा लागेल या भितीने शाळेत गेलो.पण शाळेत न जाता काळोखे वाडीमध्ये एका घराच्या बाहेर बसून मैच बघत बसलो.सचिनने या मैचमध्ये १७९ धावा केल्या होत्या.या खेळीमध्ये त्याने फलंदाजांची कर्दनकाळ समजली जाणाऱ्या वॉल्श-ॲम्ब्रोज यांचा सामना केला होता.विशेषतः भेदक गोलंदाज कर्टली ॲम्ब्रोजला हूक चा फटका मारून षटकार लगावत शतक पूर्ण केले होते.व त्यावेळेपर्यंत षटकार मारून शतक करणाऱ्या मोजक्या खेळाडूत त्याचा समावेश झाला होता.हा सचिनचा नीडरपणा मला विशेष भावला.आणि मी त्याचा "जबरा फैन" होण्याकडे वाटचाल सुरु झाली.या इनिंगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सचिन १७९ वर खेळत असेपर्यंत सर्वांना असे वाटू लागले कि सचिन ब्रायन लाराचा ३७५ धावांचा विश्वविक्रम मोडतो कि काय? पण ब्रायन लारानेच त्याचा अप्रतिम झेल घेत या चर्चांना पूर्णविराम दिला.पुढे अनेक वर्षे सचिनचा हा सर्वोत्तम स्कोअर होता.या व अशा अनेक कारणांमुळे हि खेळी माझ्या स्मृतीपटलावर अक्षरशः कोरली गेली.आणि क्रिकेट माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यास सुरुवात झाली.
माझे वय हे त्यावेळेस खेळण्याचेच होते..पण त्याचा इतका अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम लक्षात यायला मला खूप कालावधी जावा लागला.आयुष्यात अनेक टक्केटोणपे सहन करावे लागले .अनेक अपयशांचे धनी व्हावे लागले.
असो....पुढे ओघात लिहीतोच...आत्ता सचिन.....आणि क्रिकेट ....आणि माझे .....बालपण....शालेय जीवन.....
१९९५ न्यूझीलंडचा भारत दौरा डैनी मॉरीसनला सचिनने मारलेल्या एका ओवरमधील २३-२४ धावा.विनोद कांबळीचे बहुतेक सायमन डुलला मारलेले चौकार...हे अजूनही लक्षात आहेत.त्यानंतर क्रिकेटची जत्रा म्हणजे वर्ल्ड कप तोही भारतात...मग काय   बोलायचे....बर्याच मैच बघितल्या....पण खरी मजा आणली सचिनने .....हा वर्ल्ड कप जणू सचिनच्या फलंदाजीसाठीच ओळखला जाणार तेवढ्यात जयसुर्याने तडाखेबंद फलंदाजीने एकदिवसीय सामन्यांची व्याख्याच बदलून टाकली.तरीही सचिन-मार्क वॉ-अरविंद डिसिल्वा यांची फलंदाजी लाजवाब....सचिनने तर १० सामन्यात ५२३ धावा करुन विश्वविक्रम नोंदविला.सचिन या वर्ल्ड कपमध्ये २ वेळा नाबाद,२ वेळा धावबाद,दोन वेळा यष्टीचित,२ वेळा त्रिफळाचीत झाला.सगळीकडे नुसता सचिन....सचिन असा गजर होऊ लागला होता.
मी सचिनच्या फलंदाजीने इतका भारावालो होतो की,सचिन बाद होणे ही कल्पनाच करवत नव्हती.
मी त्यावेळेपासून सचिन रिटायर होईपर्यंत सचिन खेळायला आला कि सर्व देवांचा जप करत असे.इतकंच काय तर लघुशंकेला जायला देखील टाळाटाळ करीत असे....का तर सचिन बाद झाला तर...इतका अंधश्रद्धेचा कळस होत होता.
पण सचिनच्या फलंदाजीसमोर....सगळेच किरकोळ ....सचिन फलंदाजीला आल्यावर मी आणखी एक गोष्ट करायचो....क्रिकेट मध्ये जेव्हढ्या प्रकारे फलंदाज बाद होतो तेवढे  सर्वप्रकार मनातल्या मनात पुटपुटायचे म्हणजे सचिन आज याप्रकारे बाद होऊ नये... त्याबरोबरच पुढे जाऊन दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या  सामन्यात ऐन भरात असताना सचिन फैनी डिव्हीलियर्सच्या जाळ्यात सापडला.सचिन मिडविकेट फ्लिक करताना टाकलेल्या स्लो बॉलवर फसला व शॉर्ट मिडविकेटला कलीननकडे झेलबाद झाला.मला वाटते हा क्रिकेट इतिहासातील पहीला "स्लोबॉल" असावा.
या सचिनच्या बाद होण्याला सॉफ्ट डिसमिसल म्हटले गेलं...मग माझ्या बाद होण्याच्या नामजपात हा एक प्रकार जोडला गेला.....इतका सचिनच्या खेळाशी एकरुप झालो होतो.
सचिन मला आवडायचा त्याच्या तंत्रशुद्ध खेळीमुळे....सरळ बैट,कुठल्याही गोलंदाजाला मैदानाबाहेर भिरकाविण्याची साहसी वृत्ती,बाद झाल्यावर पंचांची वाट न बघता मैदान सोडण्याची खिलाडुवृत्ती,ध्येयाविषयीचे समर्पण,सर्वोत्तमतेचा ध्यास,हेल्मेटवरील तिरंगा,त्याची स्टाईल,त्याची क्रिकेटची समज.टिकाकारांना तोंडाने नाहीतर बैटने उत्तर देण्याची त्याची पद्धत.आव्हान स्विकारण्याचे साहस...सांगावे तेवढे कमी....त्याची संघवृत्ती..त्याचे अफलातून क्षेत्ररक्षण,पहिल्या स्लिपमधील कैच,सिमारेषेवरुन केलेला अचूक आणि जोरदार थ्रो,उंचावरुन आलेला झेल,अफलातून बुद्दीमान गोलंदाजी,शेन वॉर्नलाही लाजवेल अशी विविधता..लेगस्पिन,गुगली,फ्लिपर,मध्यमगती,अॉफस्पिन...त्याची शंभर कोटी लोकांच्या अपेक्षा डोक्यावर घेऊन त्यांना खरे उतरण्याची त्याची दैवीय क्षमता..सगळेच अद्भूत.अवर्णनीय.ईश्वरीय वाटावे असे....
१९९६ च्या वर्ल्ड कप पासून अनिल कुंबळेही आवडायला लागला होता.अनिल कुंबळेला कोणी षटकार मारुच शकत नाही असे वाटत होते....आणि ते बहुतांशी खरेच होते सईद अन्वर..फ्लिंटॉप..इ.चा अपवाद वगळता कुंबळेनेच हुकुमत गाजवली यात शंका नाही.
पुढे १९९६ चा इंग्लंड दौरा ..तेथील कौंटीबरोबरचे सराव सामने ...नंतर कसोटी सामने,गांगुली,द्रविडचा उदय सचिनचे २ शतक ..एकदिवसीय सामने...ॲलिस्टर ब्राऊन या फटकेबाज...फलंदाजांचा शोध...सकाळला आलेला लेख...इंग्लंड जयसुर्याच्या शोधात....त्याचे कात्रण अशी असंख्य कात्रणे ...इंग्लंड दौर्यातील तर प्रत्येक सामन्याचे तपशील असलेल्या अनेक वह्या बनविल्या होत्या.

आमच्या चुलत्यांकडे  केसरी असायचा..मी तो नियमित वाचू लागलो.त्यावेळी आमच्या कडे वर्तमानपत्र येत नव्हते.....खरे तर ते घेऊ शकत नव्हतो...त्यामुळे ते वाचण्यासाठी कधी विश्वासराव काकडे यांच्या दुकानात कधी चुलत आजोबांकडे...नंतर गणपती चौक येथील वाचनालयात...तेथून पुढे मग अनेक वर्तमानपत्रे वाचायला भेटू लागली...याच काळात वडीलांमुळे राजकारणाच्या बातम्यांमध्येही रस वाढला.अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल तर वडिलांना प्रचंड आदर...त्यांचे १३ दिवस ...नंतर १३ महिन्यांचे सरकार सगळा कालखंड नजरेसमोरुन जातोय...याबद्दल पुढे कधीतरी....
वाचनालयात लोकसत्ता वाचनात आला...त्यातील अग्रलेख वाचू लागलो...सामान्य ज्ञानात मोलाची भर पडत होती....पण खरी उत्सुकता लागायची ती रविवारच्या लोकरंग पुरवणीची...त्यातील द्वारकानाथ संझगिरी...या क्रिकेट वेड्या स्तंभलेखकाची....त्यांचा तो अप्रतिम लेख...त्यातील..विडंबन...अक्षरशः वेड लावणारे...
ते वाचता वाचता लोकरंग पुरवणीने इतर वाचनाची आवड लावली....(थोडेसे विषयांतर) त्यातील राजकिय..ललित लेख...प्रवासवर्णने,तंबीदुराई हे राजकिय विडंबन अप्रतिम ....लोकसत्ता लोकरंगने माझे विचारसमृद्ध करण्याचा पाया रचला.असो,
असे हे सचिनप्रेम खूपच कल्पनातीत होते...या क्रिकेट वेडापायी एक हुशार विद्यार्थी असलेला मी पुरता बावचळलो.१० वी ला गणित विषयांत नापास झालो.क्रिकेट बघण्याबरोबरच खेळण्याचेही वेड होते.तब्येत किरकोळ होती...पण सचिनसारखा स्टांन्स घेणे...सरळ बैटने खेळणे,सचिनसारखे फटके मारणे...असे संपूर्ण सचिनमय जीवन झाले होते...बोर्डाच्या परीक्षेवेळी सुद्धा खेळण्यावरुन वडिलांचा बर्याचदा मार खाल्ला.
एकदा तर आमचा भाऊ दत्ता व मला भंगार विकून बैट आणल्याबद्दल वडिलांनी खूपच मारले होते....
एक चांगला हुशार असताना क्रिकेटमुळे माझे नुकसान झाले.त्यामुळे वडिल तर क्रिकेटचा तिरस्कार करु लागले....आज सुद्धा वडिल हयात नसल्यामुळे हे मनोगत व्यक्त करु शकलो.वडिल असताना क्रिकेटचा एवढा विचारही करु शकलो नसतो....त्यांचेही बरोबरच होते.आधीच गरीबी ..त्यात माझ्याकडून अपेक्षा...आणि मीच असे केले तर..साहजिकच त्यांना वाईट वाटणारच....पण मी त्यानंतर कधीही माझ्या वडिलांची मान खाली जाईल असे वागायचे नाही असे ठरवले....व तसे वागायचा प्रयत्नही करतोय....अशा प्रकारे सचिन माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होऊन गेला....एवढेच काय...तो निवृत्त होण्याची कल्पनाही सहन होत नव्हती...तो निवृत्त झाल्यावर तर क्रिकेटवरचे मनच उडून गेले.....आत्ता बर्याच दिवसांनी सचिनचा सुद्धा आवडणार्या रोहित शर्माची फलंदाजी आवडते आहे.फक्त त्याच्यात सचिनसारखे सातत्य नाही.पण लवकरच तो चांगला खेळेल असे वाटते...व मी सुद्धा दुसरा सचिन त्याच्यामध्ये शोधत बसलो आहे....असा मी आणि माझा सचिन....





Comments

  1. Very Nice Writing....Liked it 👍

    ReplyDelete
  2. मनातील भावना शब्दबध करणे कठीणच असते .परंतु खूप चांगल्या पध्दतीने वर्णन केलेले आहे. आभिनंदन

    ReplyDelete
  3. छान लिखाण,पुढील ब्लॉग करिता शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

राजस्थान च्या निमित्ताने ....

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सेमीफायनलचे समालोचन