अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत
अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत
भूतकाळ- वर्तमानकाळ -भविष्यकाळ
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
- विष्णु पुराण
यानि समुद्र के उत्तर और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत, तथा उनकी संतानों को भारती कहते हैं।
भारताच्या इतिहास आणि वर्तमानाबद्दल चर्चा करताना आपण बहुतांश वेळा उत्तर भारत,पूर्व भारतातील बंगाल,मध्य भारत,पंजाब यांचाच विचार करतो...यातून चुकून आठवलेच तर दक्षिण भारताकडे आपले लक्ष जाते.. दुर्दैवाने आपण या आपल्याच देशाचा अविभाज्य घटक असलेल्या भागाकडे दुर्लक्ष करतो...
याच गोष्टींपासून बोध घेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सहकार्यवाह यांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांनी साधना केलेल्या खडकावर स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यासाठी ३०० खासदारांचा पाठिंबा मिळवला.आणि याला लोकचळवळ बनवत एक एक रुपया जमवून हे स्मारक उभे केले.या प्रयत्नांचा उल्लेख करणे महत्वाचे आहे.
आपली राष्ट्रीय माध्यमे (National Media) सुद्धा फक्त हिंदी भाषिक राज्यापुरतीच मर्यादित होवून जातात. अनेकदा या दक्षिणेकडील राज्यांच्या सांस्कृतिक, राजकिय, आर्थिक घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता असते पण कुठलीही माहिती मिळू शकत नाही...आभारी आहोत त्या यूट्यूब चॅनल्सचे ज्यांच्यामुळे ही माहितीची भूक भागवली जाते.दक्षिणेतील राज्यांमधील काही घडामोडी जाणून घ्यायची असल्यास गुगल बाबाचाच आसरा असतो.आपल्याच देशाचा महत्वाचा भाग असलेल्या प्रदेशाबाबत इतकी उदासिनता असल्यावर एकसंधपणा कसा निर्माण होणार? ... परस्परांतील एकत्वाचे,अखंडत्वाचे नाते कसे घट्ट होणार?...मला वाटते या विषयावर केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने योग्य पाऊले उचलावीत आणि हा माहितीचा असमतोल दूर होण्यासाठी प्रयत्न करावा..
*विघटनवादी शक्तिंचे षडयंत्र*
भाषेचा अडसर हा यामधील महत्त्वाचा घटक वाटतो... पण ..त्याबरोबरच दक्षिणेकडील भागाकडे दुर्लक्ष होण्याकरिता तथाकथित आर्य - द्रविड सिद्धांत,पेरियारची हिंदु धर्म विरोधी चळवळ आणि नंतरच्या काळात हिंदी भाषा विरोधी आंदोलन यांनी या परस्परसंबंधांमध्ये मीठाच्या खड्याचे काम केले. नंतरच्या काळात तत्कालीन भारत सरकारच्या श्रीलंकेमधील सिंहली - तमिळ संघर्षामध्ये शांतीसेना पाठविण्याच्या निर्णयामुळे श्रीलंकेतील तमिळ बांधवांविषयी सहानुभूती असलेले तमिळ बांधव दुखावले गेले.
त्यामध्ये विघटन वादी शक्तींनी आगीत तेल ओतण्याचे काम केले.त्याची परिणती देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम या दहशतवादी संघटनेने १९९१ च्या लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान बॉम्बस्फोट घडवून हत्या केली.
परिणामी भारताच्या अखंडत्वाला सतत आव्हान देणाऱ्या शक्तींनी हा मोका अचूक साधला.आणि भाषिक,प्रांतिक,वांशिक आधारावर दक्षिण भारत विशेषत्वाने तामिळनाडू मध्ये सतत संघर्ष पेटता ठेवण्याचे काम केले.राजकीय पक्षांनी देखील आपल्या मतपेटीच्या राजकारणासाठी हे वाढण्यास मदत होईल असे पाहिले.
*दक्षिण भारताची बलस्थाने*
वास्तविक पाहता देशाचा उत्तर भाग हा नेहमीच विदेशी आक्रमणांना सामोरा गेला आहे.या आक्रमकांना उत्तरेतच थोपवून धरण्याचे काम येथील सत्तांनी केले.त्यामुळे तुलनेने दक्षिण भारतात या आक्रमणांचा प्रभाव कमी राहिला.विजापूरची आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतुबशाही यांचा अंमल काही भागांवर राहिला पण संपूर्ण दक्षिण काही त्यांना काबीज करता आला नाही.
याचे कारण येथील संस्कृतीप्रिय,धर्मपरायण जनता असावी... दक्षिण भारताचे देशाच्या इतर भागातील लोकांमध्ये आकर्षण, औत्सुक्य निर्माण होण्याचे हे एक महत्वाचे कारण असावे...येथील धर्मसंस्कृती, खाद्यसंस्कृती ,येथील भव्य मंदिरे, त्यांचे भव्य उत्सव यामुळे अनेकांना दक्षिण भारत पर्यटनासाठी खुणावताना दिसतो..
दक्षिणेकडे मूलतः चेर,चोल आणि पांड्या या तीन राजवंशांनी दिर्घकाळ राज्य केले..पल्लव,नायक,नंतर समृद्ध असे विजयनगर साम्राज्य यांचे शासन सुद्धा उल्लेखनीय होते.छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी राजे यांनी सुद्धा तंजावर वर अनेक वर्षे शासन केले.बृहदेश्र्वर मंदिर,स्वतःचे आरमार,चोल साम्राज्य यांच्याच काळात बंगाल पासून ते दक्षिण पूर्व आशिया पर्यंत या साम्राज्याचा प्रभाव होता.नुकत्याच येवून गेलेल्या PS-1 आणि PS -2 या चित्रपटांमधून हा इतिहास अनुभवता आला.
तामिळनाडू हे दक्षिण भारतातील मोठे राज्य...क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील १० वे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ६ व्या क्रमांकावर असलेल्या तमिळनाडूला जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या समुद्री तट असलेल्या मरीना तट लाभलेला आहे. तब्बल १०७६ किमी समुद्र किनारा लाभलेले हे राज्य आहे.त्यामुळे मासेमारी हा सुद्धा शेतीसह प्रमुख व्यवसाय आहे.
ब्रिटिश काळात मद्रास प्रेसिडेन्सी व १९६८ नंतर तामिळनाडू झालेल्या या राज्यामध्ये साक्षरता ८२.९% आहे.देशात व देशाबाहेर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेजणांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.
देशाच्या विज्ञान,तंत्रज्ञान,अंतराळ संशोधन, आर्थिक क्षेत्र, व्यवस्थापन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे अनेक मान्यवर आहेत.माजी राष्ट्रपती डॉ. एपिजे अब्दुल कलाम,सि.वी रमण असे एक ना अनेक मोठ मोठे शास्त्रज्ञ हे या तमिळनाडू व दक्षिणेची देण आहेत.
कावेरी मुख्य नदी असलेल्या या राज्याचा केळी व फुल उत्पादना मध्ये पहिला,आंबे,रबर,शेंगदाणे,नारळ उत्पादनात दुसरा आणि कॉफी मध्ये तिसरा व तांदूळ उत्पादनात देशात ५ वा क्रमांक लागतो. औद्योगिक दृष्ट्या सुध्दा देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचा घटक असलेले तमिळनाडू राज्य आहे. किंबहुना हेच भारतविरोधी शक्तींना खटकत असावे...त्यामुळेच विभाजनवादी बीजे पेरली गेली आहेत. आणि अधून मधुन या शक्ती या गोष्टींना बळ पुरवून ही आग धगधगत ठेवत असतात... तमिळनाडू तर अशा शक्तींची प्रयोगभुमीच राहिला आहे.
*तामिळनाडूचे राजकारण*
१९६० च्या दशकानंतर तर देशांत अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष कमकुवत होवून (त्याची कारणे वेगवेगळी आहेत.) प्रादेशिक पक्षांनी त्यांची जागा घेतली...हेच प्रादेशिक पक्ष नंतर कौटुंबिक पक्ष बनले.. आणि सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हेच यांचे ध्येय बनले... देशहित,विचारसरणी,जनतेचे कल्याण या गोष्टी दुय्यम बनून सत्ता टिकवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यात यांनी कसर ठेवली नाही.हे करत असताना सत्ता हेच एकमेव ध्येय असल्यामुळे बाह्य शक्तींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीतून देशाच्या अखंडत्वाला धोका निर्माण करण्यास ही हे सत्तांध राजकिय पक्ष मागे राहिले नाहीत.
*विद्रोही विचारांचा प्रभाव*
सांस्कृतिक दृष्ट्या इतका समृद्ध असणारा तामिळनाडू मध्ये विद्रोही चळवळीचे प्रमुख ई. व्ही. पेरियार रामस्वामी यांनी ब्राम्हणेतर लोकांचा पक्ष म्हणून १९१७ मध्ये जस्टिस पार्टी स्थापन केली.पुढे द्रविड कळघम म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नामकरण करण्यात आले.
पण ब्रिटिशांविरुदध चाललेला स्वातंत्र्यलढा हा ब्राम्हण आणि उत्तर भारतीय वर्चस्व असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने लढल्यामुळे हे आपले स्वातंत्र्य नाही असे म्हणत १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्य दिवसाचा विरोध केल्याने पेरियार व अण्णादुराई यांच्यामध्ये मतभेद झाले.
कालांतराने पुढे १९४९ मध्ये अण्णादुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाची स्थापना केली.
द्रविड कळघम हा पक्ष नंतर DMK व AIDMK च्या प्रभावामध्ये नाममात्र राहून गेला...पेरियार यांचे शिष्य आसरियार डॉ. के. वीरमणी यांनी तो कागदावर जीवंत ठेवण्याचे काम चालू ठेवले आहे.
अण्णादुराई हे पटकथा लेखक आणि नाटककार होते.त्यांच्या अनेक नाटकांवर चित्रपट देखील आले होते. चित्रपटांना राजकिय पक्षाचा प्रपोगंडा जनतेच्या मनावर बिंब विण्याचे साधन बनविणारा पहिला राजकिय नेता म्हणजे अण्णादुराई!
आपल्या राजकिय भूमिका, विचारसरणी,पक्षाचा प्रचार चित्रपटाच्या माध्यमातून राबवून लोकांची मनोभूमिका तयार करण्याची सुरुवात करणाऱ्या अण्णा दुराई यांचे अनुयायी म्हणून पुढे हीच पद्धत करुणानिधी यांनी लिहीलेल्या कथा,पटकथा,संवाद पडद्यावर सादर करणारे सुप्रसिध्द अभिनेते एम.जी. रामचंद्रन अवलंब केली.
आणि त्या आधारावरच पुढे आपली राजकिय वाटचालीसाठी सुपीक जमीन तयार करण्याचे काम केले. करुणानिधी यांनी लिहीलेल्या चित्रपटांमधून एम.जी.रामचंद्रन जनतेचा नायक बनून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले..मग या प्रसिद्धीचा लाभ पक्षाला व्हावा यासाठी MGR यांना पक्षात सक्रीय होण्याचा आग्रह करुणानिधी यांनी केला व तो MGR नी मान्य केला.
*द्रमुक - अण्णाद्रमुक राजकिय संघर्ष*
स्वातंत्र्यानंतर १९६७ पर्यंत महान नेते सी.राजगोपालाचारी,के.कामराज यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रभावामुळे काँगेस सत्तेत राहिली..परंतु १९६० च्या दशकातील द्रविड चळवळ,हिंदी विरोधी आंदोलनामुळे द्रमुकच्या लोकप्रियतेत वाढ होऊन १९६७ निवडणुकीमध्ये सी. अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा गैर काँग्रेसी सरकार आले.
राज्य पुनर्गठना लागू झाल्यामुळे मल्याळी भाषक केरळ व तेलगू भाषक आंध्र प्रदेश,कन्नड भाषक म्हैसूर, तत्कालीन दक्षिण कर्नाटक मद्रास स्टेट मधुन वगळल्यानंतर कर्नाटक मध्ये समाविष्ट झाले.
सी. अण्णा दुराई सरकारने याचे नामकरण तमिळनाडू केले.दुर्दैवाने कॅन्सर मुळे दोन वर्षातच निधन झाल्यामुळे प्रसिद्ध पटकथा लेखक करुणानिधी हे मुख्यमंत्री झाले...मुख्यमंत्री झाल्यानंतर करुणानिधी आणि MGR यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले.MGR यांची जनतेमध्ये व पक्षामध्ये वाढती लोकप्रियता करुणानिधी यांना खटकू लागली होती.त्यातच MGR यांनी पक्षाच्या मूळ सिद्धांता पासून दूर होत असल्याचा आरोप करून करुणानिधी यांच्याशी फारकत घेतली.
१९७२ मध्ये अण्णाद्रमुक (ADMK) पक्षाची स्थापना केली. आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत १९७७ ला द्रमुक,काँगेस व तत्कालीन जनता पार्टी यांच्याशी लढा देत सत्ता हस्तगत केली.
पुढे १९८७ ला मृत्यु होईपर्यंत मुख्यमंत्री राहिले.तेव्हाची त्यांची जोडी सुपरहिट ठरली त्या जयललिता या दरम्यानच्या काळात ADMK च्या प्रमुख नेत्या बनल्या होत्या.अनेकांच्या नजरेत त्यांची प्रगती व MGR शी असलेली जवळीक खटकत होती.त्यातूनच मगर सोबत मतभेद व पुढे पुन्हा एकत्र येवून सक्रिय राहिल्या.
पण MGR यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी जानकी रामचंद्रन व जयललिता यांचे दोन गट पडले..अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या पण त्यातून मुत्सद्देगिरी दाखवत जयललिता यांनी पक्षावर पकड मजबूत केली. आणि स्वतःला MGR ची उत्तराधिकारी घोषित केले.
विस्तारभयास्तव आणि मूळ विषय बाजूला राहू नये म्हणून पुढे जाणे योग्य ठरेल.
मग यातून १९८९ पासून कधी करुणानिधी तर कधी जयललिता असा सत्तेचा खेळ चालू राहिला... करुणानिधी यांची घराणेशाही त्यातून भ्रष्टाचाराचे आरोप,प्रचंड मोठे साम्राज्य उभे राहिले...मग UPA काळातील रामसेतू प्रकरणी प्रभू श्रीरामांविषयीचे अनुद्गार...यामुळे उठलेले वादळ,2G स्पेक्ट्रम घोटाळा, अटलजींच्या सरकारच्या काळातील जयललितांचे आततायी राजकारण,तमिळ - संस्कृत वाद आणि त्यातून संस्कृत शब्दांना पर्यायी शब्द निवडण्याचे कारस्थान,कांची कामकोटीचे शंकराचार्य यांना सूडबुद्धीने केलेली अटक यामुळे तामिळनाडूचे राजकारण सतत चर्चेत राहिले. जयललिता यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होवून २००१ व २०१४ मध्ये शिक्षा सुद्धा झाली.
मग निष्ठावंत ओ पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री झाले.पुढे विशेष कोर्टातून शिक्षा रद्द होवून २०१५ ला पुन्हा मुख्यमंत्री झाल्या.आपल्या लोकप्रिय योजना व लोककल्याण सामाजिक न्याय आधारित राजकारणाच्या जोरावर मे २०१६ ला पुन्हा बहुमत मिळवून ६ व्यांदा मुख्यमंत्री बनल्या.
*तामिळनाडूच्या राजकारणातील पोकळी*
या दरम्यान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA च्या त्या जवळ येवू लागल्या होत्या.पण दुर्दैवाने ६ महिन्याच्या आतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आणि पुन्हा एकदा जयललिता यांचे निष्ठावंत ओ. पनीरसेल्वम पुन्हा मुख्यमंत्री झाले.पण सामजिक न्याय व गरीब कल्याण योजनांच्या माध्यमातून जनतेच्या अम्मा बनलेल्या जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूतील राजकिय संघर्ष,खुनशी आणि सुडाच्या राजकारणाचा एक अध्याय समाप्त झाला.
पुढे २०१८ मध्ये तब्बल ५ वेळा मुख्यमंत्री व कधीही पराभूत न होता विश्वविक्रमी १३ वेळा विधानसभा सदस्य असलेले एम करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील राजकारणात प्रचंड मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली....जी अजूनही तशीच आहे...
जयललिता यांच्या नंतर पक्षावर वर्चस्व ठेवण्याच्या वादातून मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम (OPS) आणि ई पलानिस्वामी (EPS) यांच्यातील संघर्ष सुरू झाला.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने याचा फायदा DMK ला होवू नये यासाठी मध्यस्थी करून EPS यांना मुख्यमंत्री बनवून तोडगा काढण्यात सहकार्य केले.पण हा संघर्ष वाढत जावून पुढे DMK साठी पोषक वातावरण तयार झाले.
करुणानिधी यांनी कौटुंबिक कलह आटोक्यात ठेवून आपल्या कौशल्याने एम के स्टॅलिन यांना आधीच पुढे आणायला सुरुवात केली होती..ज्याचा फायदा या दोन उत्तुंग नेत्यांच्या पश्चात तयार झालेल्या नेतृत्वाच्या पोकळी मुळे अण्णा द्रमुकच्या अंतर्गत संघर्षाचा फायदा नविन नेतृत्व म्हणून एम के स्टॅलिन मे २०२१ ला बहुमत मिळवून मुख्यमंत्री झाले.
परंपरागत संघर्ष सोडून वेगळे राजकारण करतील ही स्टॅलिन यांच्या कडून असलेली आशा त्यांनी केंद्र राज्य संघर्ष,हिंदूविरोधी निर्णय यामुळे काही दिवसातच फोल ठरवायला सुरुवात केली.
आता तमिळनाडूचा इतिहास- भूगोल - राजकारण याबद्दल केलेला ऊहापोह थांबवून ज्यासाठी हा लेखनप्रपंच केला त्या मूळ विषयाकडे येणे अगत्याचे ठरेल...
*तामिळनाडू विशेषता*
आपल्याकडे तमिळनाडू किंवा दक्षिण भारत म्हटले की केवळ साऊथ चे चित्रपट आणि त्यातील हास्यास्पद ऍक्शन सीन,रजनीकांत,कमल हसन जुने म्हटले तर MGR,NTR, डॉ.राजकुमार,शिवाजी गणेशन,मोहनलाल,मामुट्टी यांचे जनतेवरील गारूड, राजकारण म्हटले तर आमिषांची रेलचेल,टीव्ही,गॅस, टु व्हिलर,रोख पैसे ... फ्रि संस्कृती ...कधी कधी वादग्रस्त मुद्द्यांमुळे झालेली चर्चा यापलीकडे फार काही कळण्यास मार्ग नाही... आणि यातूनच या प्रदेशांविषयी आपल्यासारखीच अनेकांना उत्सुकता असू शकते.म्हणून या ब्लॉग द्वारे जुजबी माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये विशेषत्वाने राजकिय ,सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीने होत असलेला,होवू शकणारा बदल या गोष्टींकडे लक्ष वेधण्यात भाग पाडतो.
*भाजपचे मिशन दक्षिण दिग्विजय*
२०१९ च्या विजयानंतर तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा गृहमंत्री पदभार स्वीकारल्यावर श्री . जगत प्रकाश नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. आणि आधीच देशाचे लक्ष वेधून घेणारा भाजपचा २८ वर्षीय युवा प्रतिभावान खासदार श्री तेजस्वी सुर्या यांची निवड भारतीय जनता युवा मोर्चा आणि तमिळनाडू मधील सौ.वनाथी श्रीनिवासन यांची भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली.
तामिळनाडू चे निर्मला सीतारामन आधी संरक्षण मंत्री व नंतर केंद्रीय अर्थमंत्री आणि डॉ. एस. जयशंकर हे पर राष्ट्र मंत्री, कौशल विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर अशी अनेक उदाहरणे देता येतील यावरून आता दक्षिण भारतात भाजपचा पाया भक्कम करण्यासाठी भाजपने गंभीरपणे पाऊले उचलायला सुरुवात केली हे स्पष्ट जाणवले.
*के. अण्णामलाई यांचा उदय*
यासोबतच एक आणखी एक महत्वाची गोष्ट घडली होती ज्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी हा ब्लॉग मी आज लिहिण्यास प्रेरित झालो...ती गोष्ट म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये उडुपी आणि बेंगळूरु चे सिंघम म्हणून ज्या पोलीस अधिकाऱ्याने आपली ओळख निर्माण केली होती असे कुप्पुस्वामी अण्णामलाई (K. Annamalai) या IPS officer ने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होवून नोकरीचा राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला होता.
तामिळनाडू मधील गौंडर या शेतकरी कुटुंबात जन्म झालेले अण्णामलाई हे इंजिनिअरिंग आणि MBA पदवी घेवून आयपीएस परीक्षा पास झाले आहेत.इस्लाम पंथाचा विशेष अभ्यास केलेले एक कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.
कुठल्याही प्रदेशात जेव्हा स्थानिक नेतृत्व उभे राहते तेव्हा जनतेची नाळ जोडली जाते.जनतेच्या समस्या, गरजा यांची जाणीव असणारे हे नेतृत्व व्यापक जनसमर्थन मिळवू शकते. आणि याला जर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सारख्या करिष्मा असलेले नेतृत्व पाठीशी उभे राहिले तर तमिळनाडू सारख्या खडकावर सुद्धा कमळ फुलू शकते हा विश्वास नेतृत्वाला वाटला नसता तर नवल...असो...
अण्णामलाई यांच्या पक्ष प्रवेशानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष श्री एल.मुरुगन यांच्या नेतृत्वाखाली मे २०२१ मध्ये झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ४ जागा निवडून आल्या. यामध्ये लक्षणीय म्हणजे भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा सौ.वनाथी श्रीनिवासन यांनी सुप्रसिध्द अभिनेते कमल हसन यांचा दक्षिण कोइंबतूर मतदारसंघांमध्ये पराभव करून केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविला. के.अण्णामलाई यांनी सुद्धा करुर जिल्ह्यातील मुस्लिम बहुल मतदारसंघात तब्बल ६८ हजार हून अधिक मते घेत १५ हजार मतांनी पराभव होवूनही लक्ष वेधून घेतले.
तमिळनाडू मध्ये ४ व पद्दुचेरी मध्ये ६ आमदार निवडून येवून
एन रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरकार आले. हा अण्णामलाई यांचा पायगुणच असावा...
*सामूहिक नेतृत्व*
यानंतर सामुहिक नेतृत्व विकसित करण्याची कार्यपध्दती असलेल्या भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.तमिलसाई सुंदरराजन यांना तेलंगणा चे राज्यपाल व पुद्दुचेरीचे उपराज्यपाल पद दिले.नंतरचे प्रदेशाध्यक्ष श्री एल मुरुगन यांना माहिती प्रसारण राज्यमंत्री बनविले. आणि तामिळनाडूमध्ये आपला सामाजिक पाया विस्तारण्याचा प्रयत्न केला.त्याचे सकारात्मक परिणाम भाजपची वाढत असलेली स्विकार्यता यामध्ये दिसून येते.
आधीच उत्तर दक्षिण वाद या दुष्टचक्रात अडकलेल्या तमिळनाडू मध्ये राष्ट्रीय विचारधारा,आपली सांस्कृतिक मूल्ये,धार्मिक आस्था याविषयी जनतेच्या मनामध्ये पुनर्भरण करण्याची क्षमता असणारे नेतृत्व आकार घेत आहे...त्या नेतृत्वाला संपूर्ण पाठबळ देण्याची भूमिका राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली आहे.
के.अण्णामलाई हे सुध्दा आपल्या प्रभावी भाषणशैली,अभ्यासु आणि तर्कशुद्ध युक्तिवाद,आक्रमक कार्यपध्दती यामुळे सत्ताधारी द्रमुकच्या चुकीच्या निर्णय- धोरणांवर प्रखर हल्ला चढवून प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत.
बूथ स्तरापर्यंत संघटन बांधणी करून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना घरोघरी पोहचवून पक्षाचा विस्तार करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत.
द्रविड चळवळ, हिंदी भाषा विरोध,हिंदुत्व या विषयांवर आपल्या तर्कशुध्द भाषणांनी जन माणसांवर प्रभाव निर्माण करत आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरून लक्षवेधी कामगिरी केली होती.
त्यानंतर सातत्याने द्रमुक सरकार विरोधात सभा घेवून स्थानिक नेतृत्वाला संधी देत जनतेमध्ये द्रमुक विरोधात आक्रोश निर्माण करण्याचे काम जोरदारपणे चालू आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकीत २५ जागा NDA म्हणून जिंकण्याचे लक्ष्य नुकतेच गृहमंत्री अमितभाई शहा यांनी दिले आहे.सोबतच भविष्यात तमिळनाडू मधुन देशाला पंतप्रधान मिळू शकतो असे विधान केले.यातून २०२४ ला पंतप्रधान तमिळनाडू मधुन निवडणुक लढवून एक मोठा संदेश देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रनेते नरेंद्रजी मोदी यांनी तमिळ काशी संगम,सौराष्ट्र - तमिळ संगम,युवा संगम या माध्यमातून उत्तर दक्षिणेचे सांस्कृतिक बंध नव्याने भक्कम करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत.
दुसरे म्हणजे माझ्या मनातीलच गोष्ट ते बोलून गेल्याने स्वतःचाच हेवा वाटला...कारण के.अण्णामलाई हे ज्या प्रकारे प्रकाशझोतात येवू लागले आहेत ते पाहता २०२६ ची निवडणुक लक्षवेधी ठरणार यात शंका नाही...मग प्रथम तमिळनाडू मध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री आणि १५- २० वर्षांनी देशाचे पंतप्रधान अशी मजल मारल्यास आश्चर्य वाटायला नको... कुणी मुख्यमंत्री - पंतप्रधान बनणे इतकी संकुचित आकांक्षा यामागे नाही तर उत्तर भारत... दक्षिण भारत हा भेद मिटून अखंड भारत समर्थ भारत सशक्त भारत बघण्याची इच्छा याचि देही याचि डोळा पाहायला मिळो ही प्रभू श्रीराम चरणी नतमस्तक होऊन मागणे आहे....बाकी काही नाही...
*कंटकाकिर्ण मार्ग*
वास्तविक पाहता अण्णाद्रमुक सोबत युती टिकवणे महत्वाचे आहे पण अण्णामलाई यांचे आक्रमक नेतृत्व व भाजपचा वाढत चाललेल्या प्रभावामुळे अण्णाद्रमुक व द्रमुक दोघांची चिंता वाढली आहे.
पण वाट तितकीशी सोपी सुध्दा नाही... तब्बल ७०-८० वर्षे विद्रोही, साम्यवादी विचारांचा प्रभाव असलेल्या तमिळनाडू मध्ये भाजप सारखा हिंदुत्व पुरस्कर्ता असलेला पक्ष कशी वाटचाल करणार यावर माझ्यासारखे अनेक देशभक्त लोक डोळे लावून बसले आहेत.
आधीच रजनीकांत यांच्या सारख्या सुपरस्टार ने राजकारणातून माघार घेतली...कमल हसन प्रभावहीन झालाय...अशातच अभिनेता विशाल आणि अभिनेता जोसेफ विजय हे राजकिय निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत...यातून के आण्णामलाई स्वतःची वाट तयार करत आहेत.
या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत हा अनाठायी संघर्ष संपुष्टात येवून एक भारत श्रेष्ठ भारत निर्माण होण्यासाठी सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास सबका प्रयास या भूमिकेत संपूर्ण देश एक विचाराने प्रेरित होवून या महान राष्ट्राला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत होईल ही आशा आहे.आणि त्या आशेतूनच या सर्व घडामोडी पाहत एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून अतिशय सुखावणारी कल्पना वास्तवात येवो ही अपेक्षा!
बेहतरीन तरीके से विश्लेषण किया गया है। अध्यक्ष महोदय
ReplyDeleteअभ्यासपूर्ण आहे ,याचा प्रसार नक्कीच सर्वत्र व्हायला पाहिजे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअभ्यास पूर्ण लेखन , हा विषय सगळी कडे जायला हवा
ReplyDeleteखुपच अभ्यासपुर्वक माहिती आहे.
ReplyDelete