राजस्थान च्या निमित्ताने ....
१५ जुलै २०२०
राजस्थान च्या निमित्ताने ....
राजस्थानमध्ये राजकिय अस्थिरता का निर्माण झाली हे पहायला हवे.
देशभर मोदी त्सुनामी जोरात असताना सेमीफायनल म्हणून गाजलेल्या राजस्थान-मध्यप्रदेश-छत्तीसगड-दिल्ली या राज्याच्या निवडणुकांमध्ये दिल्ली वगळता सचिन पायलट,ज्योतिरादित्य सिंधिया,भूपेशसिंह बघेल असे नवीन नेतृत्व प्रदेशाध्यक्ष ,प्रचार प्रमुख म्हणून पुढे आणले होते.याचा थेट परिणाम होऊन तिन्ही राज्यांमध्ये सत्ताविरोधी वातावरण निर्माण करण्यात काँग्रेस बर्यापैकी यशस्वी ठरली होती.आणि त्याचा फायदा सुद्धा निवडणुकीनंतर काँग्रेसला मिळालेला पहायला मिळतो.पण म्हणतात ना...युद्धात जिंकले आणि तहात हरले तसे काँग्रेसचे झाले...ज्या नवीन नेतृत्वाला पुढे आणून काँग्रेसने पर्यायी स्थानिक नेतृत्व उभे करुन भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले...त्या नवीन नवीन नेतृत्वालाच राजस्थानमध्ये सचिन पायलट व मध्यप्रदेश मध्ये ज्योतिरादित्य यांना (यांना अधिकच) दुय्यम स्थान देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला...
वास्तविक पाहता या नवीन नेतृत्वाला अधिक ताकद देऊन काँग्रेस भाजपला पुरते नामोहरम करु शकली असती पण ती संधी दरबारी राजकारणामुळे गमावली...कदाचित हे नवीन नेतृत्व पक्षात अधिक लोकप्रिय होऊन राहुल गांधींच्या नेतृत्वालाच आव्हान उभे राहु नये म्हणून यांचे पंख छाटले असावेत...असो...एक चांगली संधी मात्र काँग्रेसने गमावली हे नक्की ...
या पार्श्वभूमीवर सध्याची राजस्थानमधील परिस्थिती पाहता...मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना अल्पमतातले सरकार चालविण्याची कसरत करावी लागेल.
सचिन पायलट यांचे फिस्कटलेले गणित,अपेक्षित आमदार जुळविण्यात आलेले अपयश...यामुळे तूर्तास अशोक गेहलोत यांना दिलासा मिळाला आहे.तो किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही.
दरम्यान आधी झालेल्या हकालपट्टी आणि त्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही या सचिन पायलट यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने घरवापसीचे केलेले आवाहन याला सचिन कसा प्रतिसाद देतात ते पहावे लागेल.सचिन पायलट पुन्हा जरी काँग्रेसकडे गेले तरी मने कलुषित झाली असताना अशा अस्थिर झालेल्या सिंहासनावर घट्ट पकड ठेवून बसण्याचा अशोक गेहलोत यांना प्रयत्न करावा लागणार आहे.
पण दुसरीकडे भाजपामध्ये वसुंधराराजे यांची पक्षावरील मजबूत पकड व त्यामुळे प्रसंगी केंद्रीय नेतृत्वाला झुकविण्याची क्षमता या गोष्टीचा विचार सचिन पायलट यांना घेताना किंवा वाटाघाटी करताना विचार गांभीर्याने करावा लागेल.
वसुंधराराजे तयार झाल्याच आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रयत्न फळाला आल्यावर सुद्धा भाजपापुढे नेतृत्वाचा गहन प्रश्न उभा राहणारच आहे....
मला तर या सर्व प्रकरणामध्ये सचिन पायलट हे तटस्थ राहण्याची किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची शक्यता जास्त वाटते.आणि यामध्ये भाजपा निश्चितच फायद्यात असेल.
अल्पमतातले सरकार चाविण्यापेक्षा ५-६ महिन्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतील...आणि ना गेहलोत ना सचिन पायलट मा.केंद्रीय मंत्री सी.पी.जोशी किंवा तत्सम दरबारी व्यक्ती यांचे नेतृत्व काँग्रेसकडून पुढे आणले जाऊ शकते...
सचिन पायलट स्वतःचा पक्ष काढून जनमत आजमावून पाहू शकतील...
गुर्जर समाज व मीणा समाज यांच्यासह छोट्या छोट्या जातीसमुहांची मोट बांधून सचिन पायलट निवडणुकीला सामोरे जातील...
भाजपा सुद्धा गजेंद्रसिंह शेखावत,राज्यवर्धनसिंह राठोड किंवा ओम बिर्ला किंवा अनपेक्षित नवीन नेतृत्वाला संधी देऊन निवडणुक लढवू शकते.
गेल्या काही निवडणुकीपासून गुर्जर समाज भाजपावर नाराज होऊन काँग्रेसकडे गेला असताना आता सचिन पायलटमुळे सत्तेचा तिसरे केंद्र उभे राहिल्यावर ही मते ना भाजप ना काँग्रेस अशी सचिन पायलट यांच्या कडे जाऊन तिरंगी लढतीमध्ये भाजपाला फायदा होऊन सत्तांतर होण्याची खूप मोठी शक्यता असणार आहे.
अशा स्थितीमध्ये वसुंधराराजे असतील तर बर्यापैकी व नेतृत्व बदलल्यास चांगले बहुमत मिळवून भाजपा पुन्हा एकदा मरुभूमीच्या राजसिंहासनावर आरुढ होताना दिसेल.
*रविंद्र बाळासाहेब माने*
अंदाज अपना अपना
Perfect analysis
ReplyDelete