माझे वडिल-माझे प्रेरणास्रोत

"माझे वडिल...माझे प्रेरणास्रोत!"



"रविंद्र बाळासाहेब माने"
असे पूर्ण नाव लिहिल्याशिवाय मनाला समाधानच वाटत नाही.लहानपणापासूनच असे संपूर्ण नाव लिहिण्याची सवय आहे.अगदी इंटरनेटच्या जंजाळात वेगवेगळे अकाऊंट ओपन करण्यासाठी अनिवार्य नसतानाही संपूर्ण नावच टाकले आहे.कारण असे संपूर्ण नाव लिहिल्याशिवाय माझ्या नावाला पूर्णत्वच प्राप्त होत नाही.किंबहुना वडिलांच्या नावाशिवाय माझे नाव अशी कल्पनाच करवत नाही.त्यांचे नाव जोडले गेल्यामुळेच कुठे जीवनाला अर्थ प्राप्त झालाय!
"वडिल" म्हणजे काय आपणा सर्वांना काय सांगावे?
आज आषाढ शुद्ध दशमी (३ जुलै) माझे वडिल वैकुंठवासी बाळासाहेब तुकाराम माने यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन!
बघता बघता दोन वर्षे झाली वडिल जाऊन! ज्यादिवशी वडिलांची आठवण येऊन डोळे पाणावले नाहीत...असा एकही दिवस गेला नाही.वेगवेगळे प्रसंग,कार्यक्रम किंवा सहज कुणाकडील सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येक वेळी त्यांची आठवण हि निघतेच.त्यामुळे ते आम्हाला सोडून गेले आहेत असे वाटतच नाही...आत्ताच येतील..नंतर येतील असे वाटत राहते...
आमचे वडिल म्हणजे माझ्यासाठी माझा आदर्शच!
निर्व्यसनी ..अगदी सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसणारे वडिल मिळण्यासाठी भाग्यच लागते.आणि ते भाग्य आम्हाला लाभले.याबद्दल परमेश्वराचे कोटीकोटी धन्यवाद!
कारण त्यांंच्यामुळेच मी सुद्धा कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही.
अतिशय धार्मिक प्रवृत्ती...
अतिशय लोकसंग्राहक स्वभाव ...
समाजप्रिय...नातेवाईकांशी सलोख्याने वागणारे...
भावकी जोडली राहण्यासाठी प्रयत्न करणारे,मंडळ-समाजातील मतभेद मिटविण्यासाठी प्रसंगी कमीपणा घेणारे,
दुःखद प्रसंगी सतत जाऊन संबंधित कुटुंबाची सोबत करणारे...
कुठल्याही कार्यक्रमासाठी,मिटींगसाठी,लग्नकार्य,जत्रा मग ती कोणाच्याही घरची असो सगळ्यांना घरोघर जाऊन आवाज देऊन गोळा करणारे...
विशेषतः महिलांना अतिशय हक्काने रागावणारे...
दसर्याला आपट्याची पाने व संक्रांतीला तीळगूळ प्रत्येकाच्या घरी जाऊन संबंधातील ओलावा टिकवणारे..
सर्वांचा चांगला विचार करणारे माझे वडिल...
मुलांना गोट्या खेळताना ओरडणारे...
आळीतील मुली तर वडिल जाता येताना दिसले तर खाली बघून चालायच्या.आदरयुक्त भिती होती वडिलांची ...एक ना अनेक वैशिष्ट्ये माझ्या वडिलांची ...
घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे काय? याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे वडिल!
यासगळ्याचा नकळत खूप मोठा संस्कार माझ्यावर घडला.मी त्यांंच्या अनेक गोष्टींची कॉपी करायला लागलो.त्यांंच्या सारखेच बनण्याचा प्रयत्न करु लागलो.
ते नेहमी म्हणायचे "पैसा म्हणजे सर्वस्व नाही..एकमेकांशी चांगले संबंध ठेवणे हिच खरी संपत्ती!
एक जेमतेम शिकलेला,मजूरी करणारा,गाढवे हाकलणारा,टोपल्या विणणारा,स्वाभिमानाने स्वतःचा वीटभट्टी व्यवसाय करणारा एक सामान्य व्यक्ती पण आमच्यासाठी असामान्य असणारे व्यक्तीमत्व!
खिशात २० रु.असल्यावर त्यातील १० रु.घरात देऊन कुणाच्या दुःखद प्रसंगात सहभागी होण्यासाठी ऊन-पावसाची तमा न बाळगता हजर राहण्याचा अट्टाहास करणारे माझे वडिल..
भावकीतील सर्वांच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी घरदाराचा विचार सोडून ध्यास लागल्यासारखे फिरणारे माझे वडिल...
स्वतःच्या आईवडिलांवर जीवापाड प्रेम करणारे आमचे वडिल.आमच्या आत्यांच्या मिस्टरांनी लावलेली नोकरी आईवडिलांपासून दूर रहायला लागेल म्हणून सोडली.आणि गेले आईवडिलांबरोबर सुगीला (टोपल्या विणण्याचा व्यवसाय करण्यासाठी) गहुंज्याला निघून..
शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत पण वाचनाची खूप आवड होती.वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे.राजकारणावर तर एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखे चर्चा करायचे.श्रध्देय अटलजी तर त्यांचे दैवतच! त्यांंच्या विषयीची बातमी वाचताना किंवा बघताना त्यांंच्या चेहर्यावरचा विलक्षण आनंद बघण्यासारखा असायचा.
श्रध्देय अटलजी पंतप्रधान झाल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.आणि सरकार पडल्यावर झालेला दुःखावेग अजूनही चांगला लक्षात आहे.त्यावेळेस ते माझ्याशी राजकारणाबद्दल खूप बोलायचे.मला सुद्धा खूप गोडी लागली होती.
मला ते त्यावेळी सारखे शाखेत जात जा म्हणून आग्रह करायचे.जर खेळण्यामुळे कंटाळा केला तर ओरडायचे.म्हणायचे संघाचे काम चांगले आहे.चांगले संस्कार घडतात तू जा आणि दुसर्यांना पण नेत जा.
पुढे मी संघाची जबाबदारी घेऊन काम करु लागल्यावर मला खूप पाठिंबा दिला.खूप प्रोत्साहन द्यायचे.घरी प्रचारक किंवा इतर मोठे कार्यकर्ते आले तर संघाविषयी गप्पा मारायचे.मी संघशिक्षण पूर्ण करत असताना मला ऐन वीटभट्टी सीझनमध्ये २०-२२ दिवस प्रथम -द्वितीयला पाठवले होते.तेव्हा मी कामानिमित्त वराळे येथे सकाळी ७ वा.सायकलवरुन वडिलांसोबत जायचो.पण मला शाखा घेण्यासाठी ५ वाजताच सुट्टी करुन पाठवून द्यायचे. हे करत असताना पुढे बनेश्वर वस्ती प्रमुख,शहर सहकार्यवाह म्हणून काम करताना रोजचे संघकाम बघून ते एके दिवशी म्हणाले "तूला इथे राहून जितके काम करायचे असेल तितके कर.आमची काहीच ना नाही.पण प्रचारक जायचा विचार मनामध्ये आणू नको." यानंतर त्यांनी मला खूप प्रोत्साहीत केले.२००७ मध्ये मी संघाचे तृतीय वर्ष संघशिक्षण पूर्ण करायला नागपूरला गेलो तेव्हाही त्यांना खूप आनंद झाला होता.संघाबद्दल त्यांंच्या मनात खूपच आदर होता.कधीही मनात आले तर सकाळी प्रभात शाखेत जाऊन प्रणाम करुन यायचे...बर्याचदा प्रार्थनेलाही थांबायचे.संघाच्या प्रत्येक उत्सवाला न चुकता उपस्थित रहायचे.असे होते माझे स्वयंसेवक वडिल!
एक खूपच मजेदार आठवण आहे.१९९८ मध्ये ॲड.विराज काकडे हे भाजप कडून मा.शरद पवार यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते आणि श्रध्देय अटलजींची सभा भोसरी येथे होणार होती.वडिलांना याची माहिती आधीच झाली होती पण पावसाचे दिवस तोंडावर असल्यामुळे वीटभट्टीसाठी कोळसा आणायचा होता.पण त्यांंचा अर्धा जीव सभेकडे लागला होता.मला म्हणाले चल आपण पुण्यात कोळसा आणायला जाऊ...मी निघालो...लोकलने जात असताना अचानक कासारवाडी येथे उतरून भोसरीला अटलजींच्या सभेला जायचे म्हणाले...मी सुद्धा खूश झालो.भोसरीला गेलो तेथे तळ्याच्या बाजूला ओबडधोबड माळरानावर सभा होती.मा.अटलजींचे भाषण ऐकले...पण तेथली कुजबूज ऐकून वडिल म्हणाले फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरेश कलमाडी साठी पण आता सभा आहे जायचे का? मी जाऊया म्हणालो..तिथून तडक गाड्या बदलत फर्ग्युसन कॉलेजला पोहचलो.तिथे तुडुंब गर्दी ....ते भाषण ऐकले ...हॉटेल सुरभीमध्ये जेवण केले आणि कोोळसा आणायला पोहचलो पण तिथे दुकान बंद झाले होते.मग पुन्हा दुसर्या दिवशी जाऊन कोळसा आणला होता.असे होते आमचे वडिल....अटलजींचे भाषण म्हटले कि त्यांंच्यात खूप उत्साह संचारायचा.कुठेही बसलेले असले की हमखास राजकारणाचा विषय काढणारच...मग अटलजी...भाजप सरकार........सगळेच भाजपमय....
असे आमचे वडिल पैशाअडक्याने गरीब पण त्यांंच्याकडे समाधानाची श्रीमंती होती.लोकसंग्रहाची श्रीमंती होती....ते आणखी एक सांगायचे "आयुष्यात समाधान खूप महत्वाचे ..नसती हाव आणि भिकेला लाव..असे ते म्हणायचे!
१९८३ मध्ये त्यांना मी लहान असताना त्यांना भट्टीवर काम करता करता एक सोन्याची गणपतीची मूर्ती सापडली.आणि गणपती बाप्पाचे ते निस्सीम भक्ती करू लागले.घरात कित्येक अडचणी आल्या पण त्या गणपती विषयी त्यांंच्या मनात चुकिचा विचार कधी आला नाही.
कर्ज काढून व्यवसाय करायचे पण नेहमी सांगायचे घरात अर्धी भाकर खाऊन दिवस काढावे लागले तरी चालतील पण कधीही कूणाचा एक रुपयाही बुडवायचा नाही.असे संस्कार त्यांनी आमच्यावर केले.
आमचे आजोबा वैकुंठवासी तुकाराम तात्या माने हे विठ्ठल मंदिरात ४० वर्ष वीणेकरी म्हणून नित्यनेमाणे हरीपाठ घेत होते.त्यांंच्या नंतर वडिलांनी वीणेकरी म्हणून सप्ताह काळात सेवा केली.आता वडिलांनंतर मी हि परंपरा चालू ठेवली आहे.तेवढीच वडिलांची आठवण काढण्याची आणखी एक संधी...
असे होते माझे वडिल....
आणखीही खूप आहे सांगण्यासारखे पण विस्तारभयास्तव थांबणे उचित होईल.
असे वडिल लाभणे हे माझे परमभाग्य.....आज ते नसल्यामुळे त्यांची उणीव पदोपदी जाणवते आहे...टोचते आहे.....पण काय करणार....परमपिता पांडुरंगाची आज्ञा!

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

पंजाबची दुखरी नस