पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने
*पुणे पदवीधर च्या निमित्ताने....*
६ डिसेंबर २०२० त.दा.
*गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकिय अवकाश व्यापलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या.कधी नव्हे एवढी चुरस यावेळी पहायला मिळाली.नाहीतर पदवीधर निवडणुका कधी होऊन जातात हे नागरिकांना कळत सुद्धा नव्हते.बरेच नागरिक या निवडणुकीबद्दल,प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेले दिसले.*
*अतिशय चुरशीच्या वाटणाऱ्या व भाजपाच्या बाजूने वाटणारा निकाल अनपेक्षितपणे विरोधात आला.आणि अनेकांना धक्का बसला.विशेषतः आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मतदार बाहेर काढून मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्न केले...प्रत्येक निवडणुक काही ना काही शिकवून जात असते...याही निवडणुकीमुळे विचारमंथन...आत्ममंथन...पराभवाचे विश्लेषण...नेतृत्वावर प्रश्नचिन्ह...अशी एक ना अनेक उलथापालथ होताना दिसते आहे...हे व्हायलाच हवे.*
*फेसबुक..व्हाॕट्सॲप युनिव्हर्सिटी मध्ये अनेक विचारवंत जन्माला घातलेत..या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी म्हणून या निवडणुकीच्या बाबतीत माझे स्वतःचे निरिक्षण नोंदवावेसे वाटले...*
*सुरुवातीपासूनच या मतदारसंघामध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याचा वरचष्मा असल्याचे इतिहास सांगतो...मा.प्रकाशजी जावडेकर यांचा २००२ ला झालेला पराभव वगळता भाजपाचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ आहे.याच मतदारसंघामध्ये २००८ मध्ये अभाविप मध्ये बरीच वर्षे काम केलेल्या चंद्रकांतदादांना उमेदवारी देऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मराठा नेतृत्व पुढे आणण्याचा पाया रचला गेला...पुढे २०१४ ची निवडणुक जिंकून मा.देवेंद्रजी फडणवीस सरकारमध्ये महत्वाचे मंत्रीपद देऊन चंद्रकांतदादा पाटील यांना ताकद देऊन पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न सुरु झाला.संघाच्या मुशीतून तयार झालेले आणि अभाविपच्या संघटनात्मक आणि आंदोलनात्मक रचनेतून घडलेले दादा ..देवेंद्रजींसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापित राजकिय घराणी भाजपाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरु लागले.कागलचे समरजितसिंह घाटगे,मा.खा.धनंजय महाडीक,सांगलीचे देशमुख कुटुंबिय,मोहिते पाटील,हर्षवर्धन पाटील,जयकुमार गोरे,रणजीतसिंह निंबाळकर,असे एक ना अनेकांना ते भाजपाशी जोडण्यात यशस्वी होत गेले.*
*हे करत असताना जिथे भाजपाचा आमदार खासदार निवडून येत नाही...किंवा नजीकच्या काळात निवडून येण्याची शक्यता नाही...अशा ठिकाणचे नेत्यांना प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ला अक्षरशः खिळखिळी करण्याचे काम केले...याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमधील यशामध्ये दिसून आला.हाच परिणाम पुढे विधानसभा निवडणुकीत दिसणार होता.पण खणता राजांच्या पडद्यामागील घडामोडींमुळे एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या प्रयत्नांमुळे अपेक्षित यश मिळु शकले नसेल...तरी कौल महायुतीला होता....पण नंतर काय झाले...त्याचे परिणाम महाराष्ट्र काय भोगतोय...हे सर्वश्रुत आहे.असो...*
*पदवीधर कडे येऊयात...आश्वासक आणि कायद्याच्या कसोटीवर खरे उतरणारे मराठा आरक्षण देऊन दाखवून तर या दोघांनी साहेबांची दुखरी नसच दाबली....यानंतर अनेक नेत्यांना मा.देवेंद्रजी यांच्यासह दादांनी भाजपामध्ये प्रवेश देऊन विरोधकांच्या शिडातील हवाच काढून घेतली...याबरोबरच बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मा.देवेंद्रजी व चंद्रकांतदादा यांनी भाजपाच्या विजयासाठी यंत्रणा राबविली त्यातून आधीच रागविलेले युगपुरुष संतापणे स्वाभाविकच होते...लहानपणापासून एक गोष्ट सतत कानावर पडायची शरद पवार पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षातील नेत्यांना कसे संपवतात...आणि ती भीती कसे अनेक नेत्यांच्या मनात घर करुन होती.*
*तीच मळमळ देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा यांच्याविषयी बारामतीकरांची वेळोवेळी दिसून येत होती...महाराष्ट्रातील राजकिय परिस्थिती पाहता या दोघांना पुन्हा एकदा शह देऊन भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळून टाकण्यासाठी पदवीधर/शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने संधी साधली गेली...*
*गेल्या दोन निवडणुकांमध्ये म्हणावे एवढे सक्रीय नसणारे भारती विद्यापीठ आणि डि.वाय.पाटील या व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक शिक्षण-सहकार सम्राट यांनी ही निवडणुक अक्षरशः उचलून धरली...*
*कोल्हापूर आणि सातारा जिल्यामध्ये स्थानिक नेतृत्व नसल्याने मोठा फटका बसला.पुण्यातील मतदानाची कमी टक्केवारी विचारमंथन करण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे.*
*या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच शरद पवार हे कुठल्याच पिक्चर मध्ये दिसले नाहीत...यातून आम्ही एवढे सिरियस नाहीत हे भासवून विरोधकांना गाफील ठेवण्याची खेळी खेळली गेली असावी.आणि पडद्यामागून या निवडणुकीच्या विजयासाठी आवश्यक एकजुटीची मोट बांधली गेली असावी.*
*या निवडणुकीमध्ये आणखी एक महत्वाचा फॕक्टर आहे....जलसंपदा खाते...हे खाते पश्चिम महाराष्ट्राच्या राजकिय नाड्या हातात ठेवणारे खाते आहे.हे खाते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे...व अरुण लाड हे जयंत पाटील यांचे उमेदवार होते....यात आणखी काही सांगण्याची आवश्यकता आहे का?*
*अशा सर्व घडामोडींमुळे पदवीधर व शिक्षक मतदारसंघामध्ये पराभव पहावा लागला असे माझे मत आहे...यात संपूर्णपणे नेतृत्वाला दोष देणे चुकीचे वाटते...काही सुधारणा कराव्या लागतील ते पक्षाचे नेतृत्व करतीलच...पण आपण एक कार्यकर्ता म्हणून १०% योगदान दिले का? आणखी काय योगदान देऊ शकलो असतो असा विचार करायला काय हरकत आहे!*
*रविंद्र बाळासाहेब माने*
(तळेगाव दाभाडे)
Comments
Post a Comment