कर्नाटक पराभव -भाजपच्या अपरिहार्य तेचा परिणाम

कर्नाटकच्या निमित्ताने भाजप - येदुरप्पा - अपरिहार्यता- मीमांसा
अभिनंदन काँग्रेस
आज बहुचर्चित अशा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळविला त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या विजयासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुन खरगे (वय ८१ वर्ष) प्रदेशाध्यक्ष श्री. डि.के.शिवकुमार,माजी मुख्यमंत्री श्री.सिद्धरामय्या यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि विजय मिळविला.
काँग्रेसच्या यशाची कारणे
निवडणुक जाहीर होण्याच्या आधीपासूनच काँग्रेसने भाजपला विविध मुद्द्यांवर घेरत फ्रंटफुट वर बॅटिंग करायला सुरूवात केली होती. यामध्ये तथाकथित भ्रष्टाचार,४०% चे सरकार हे सातत्याने बोलुन बोम्म्ई सरकार विरोधात वातावरण पेटवले.

 भाजपचे अवलंबित्व
नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या धोरणातून अनेक राज्याचे मुख्यमंत्री बदलले तसेच कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस.येदुरप्पा यांना बदलून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.पण उत्तराखंड,आसाम,त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलणे आणि कर्नाटक चे मुख्यमंत्री येदुरप्पा यांना बदलणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे...तो ओळखण्यात चूक झाली हे मान्य करावे लागेल.
कर्नाटक या दक्षिण दिग्विजयाचे प्रवेशद्वार ठरलेल्या राज्यामध्ये इतर भाजपशासित राज्यांप्रमाणे संघटनात्मक बांधणी मजबूत नाही.येथे येदुरप्पा हेच एकखांबी तंबू होते.कारण संघ प्रचारक म्हणून सुरुवात केलेल्या येदुरप्पा यांनी भाजपची जबाबदारी घेतल्यापासून ३५-४० वर्षे पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले. कर्नाटक मध्ये संख्येने जवळपास १७ % मतदार संख्या असलेला व तब्बल ८० मतदारसंघांमध्ये प्राबल्य असलेला लिंगायत समाज हा माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांना काँग्रेसने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नाराज होवून पुढे येदुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली एकवटू लागला होता.

येदुरप्पांचा उदय
येदुरप्पा यांच्या नेतृत्वात पुढे २००४च्या निवडणुकीमध्ये भाजप ७९ जागा मिळवुन सर्वात मोठा पक्ष ठरला होता.याच कामगिरीने संपुर्ण देशाचे लक्ष येदुरप्पा यांनी वेधून घेतले होते.कारण पहिल्यांदाच दक्षिणेतील राज्यात भाजपने लक्षणीय कामगिरी केली होती.पण धर्मनिरपेक्षतेच्या सोयीस्कर आणि गोंडस नावाखाली धरम सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ६५ जागा आणि एच. डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात JDS ५८ जागा जिंकल्या आणि काँग्रेस व JDS यांनी एकत्र येत धरम सिंह यांना मुख्यमंत्री करत सरकार स्थापन केले.

परंतु महत्वाकांक्षी कुमारस्वामी ने धरम सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले.आणि इथे एक समझोता केला गेला की उरलेले ४० महिने २० महिने JDS व २० महिने भाजपचा मुख्यमंत्री राहील.पण  कुमारस्वामीने स्वतःचे २० महिने पूर्ण होताच भाजपचे येदुरप्पा मुख्यमंत्री झाल्यावर ५ दिवसातच सरकारचा पाठिंबा कुमारस्वामी यांनी काढला आणि संपुर्ण कर्नाटकमध्ये फसविले गेलेल्या येदुरप्पा यांच्याविषयी सहानुभूती ची लाट तयार झाली आणि कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली.(यावेळी केंद्रात UPA sarkar होते.) आणि त्यानंतर २००८ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत ११० जागा जिंकून भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष बनला.
आणि .......भाजपच्या दक्षिण दिग्विजयाचे दार उघडले गेले.कुमारस्वामी ने अशी काही चूक केली की ज्याचे परिणाम एक प्रबळ पक्ष ते दुय्यम पक्ष अशी अवस्था JDS ची पुढे झाली की JDS परत कधीही ५० चा आकडा गाठू शकली नाही.
परंतु हा विजय भाजप साठी काही एवढा सुखकर ठरला नाही.६ अपक्षांची मदत,आणि सत्ता आणण्यासाठी वादग्रस्त बेल्लारी बंधूंची घेतलेली मदत,येदुरप्पा यांच्यावरील तथाकथित भ्रष्टाचाराचे आरोप,अडवाणी जी यांची भ्रष्टाचार विरोधी यात्रा,तत्कालीन काँग्रेसी राज्यपाल  हंसराज भारद्वाज यांचा येदुरप्पा सरकार बदनाम करून अस्थिर करण्याचे प्रयत्न, लोकायुक्त संतोष हेगडे यांचा हेकेखोरपणा, परिणामी येदुरप्पा यांचा राजीनामा, वोक्कालिगा नेते सदानंद गौडा मुख्यमंत्रीपदी निवड,त्यानंतर जगदिश शेट्टर मुख्यमंत्री व पुढे येदुरप्पा यांचा राजीनामा व कर्नाटक जनता पक्ष स्थापना आणि २०१३ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव आणि काँग्रेस बहुमत मिळवून मुख्यमंत्री ...पुढे मोदीजी यांनी येदुराप्पा आणि उमा भारती यांना पक्षात आणले.
 यानंतर २०१८ निवडणुक, भाजप पुन्हा मोठा पक्ष..सरकार स्थापन करण्यात यश नाही..राजीनामा...भावनिक भाषण.... पुन्हा काँग्रेस JDS एकत्र येऊन भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी ३८ आमदार असलेल्या कुमारस्वामी मुख्यमंत्री ...मग  सत्तेच्या लाभासाठी आपसातील संघर्षात आमदार फुटून राजीनामा दिल्याने  सरकार पडून भाजप पुन्हा  सत्तेमध्ये.. येदुरप्पा मुख्यमंत्री ...
इथपर्यंत सगळे ठीक चालले होते.पण ७५ वर्षांवरील नेत्यांना निवृत्ती या धोरणाचा अवलंब करून भविष्यातील पक्षवाढीसाठी नवीन नेतृत्वासाठी जागा सोडण्यासाठी येदूरप्पा यांचा राजीनामा अंगलट येवून आजच्या पराभवाची बीजेच रोवली गेली होती असे म्हणता येईल.
वरील सर्व घटना विस्तृत सांगण्याचे कारण म्हणजे कर्नाटक मध्ये भाजप म्हणजे येदूरप्पा... येदुरप्पा म्हणजे लिंगायत समाज ... आणि भाजपचे येदुरप्पा यांच्यावरील अवलंबित्व हे लक्षात यावे म्हणून नमूद केला...

अस्ताकडे वाटचाल
 किंबहुना राजकारणातील आपली अपरिहार्यता  टिकून रहावी हेच अशा नेत्यांचे धोरण असते.मग यातूनच नवीन नेतृत्व तयार होवू न देणे ...तसा प्रयत्न झालाच तर मग आपले उपद्रवमूल्य आधी दाखवून दिले आहेच त्या दबावतूनच मग पक्षाला वेठीस धरणे आणि आपले स्थान अबाधित राहील यासाठी संघटनात्मक बांधणी करून विस्तार करण्यास अडचणी निर्माण करणे...यातच हा नेता गुरफटून गेला असे खेदाने म्हणावे लागते आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेला हा नेता नंतर संकुचित मनोभूमिकेतून जाती पुरताच मर्यादित होवून गेला.हिंदुत्वाची व्यापकता,राष्ट्रवादाचा विचार सोडून परिवारवाद मध्ये अडकला आणि स्वतःचे व पक्षाचे,देशाचे,हिंदुत्वाचे खूप मोठे नुकसान करून बसला.

असुरक्षेच्या भावनेतून वोक्कलिगा समाजातील नेतृत्व जे भाजपसाठी कठीण असलेल्या म्हैसूर  विभागातील तरुण खा.प्रताप सिम्हा, राष्ट्रीय सरचिटणीस श्री.CT रवि असतील किंवा राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल.संतोष,भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष बेंगळुरू चे युवा खा.तेजस्वी सुर्या असेल या व अशा अनेक नवीन नेत्यांना क्षमता असुनही येदुरप्पा यांनी यांचे नेतृत्व हवे तसे बहरू दिले नाही.यामुळेच कर्नाटक मध्ये भाजप केवळ एका जातीचा आणि तोही एका नेत्याच्या मेहरबानीवर चालणारा पक्ष बनत गेला.
या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक द्वंद्व सुरू होण्याआधीच येदुरप्पा यांना थांबण्यास सांगण्यात आले.आणि हिमंत बिस्व सरमा पॅटर्न प्रमाणे बोम्मई मुख्यमंत्री झाले.
यानुसार २०२४ च्या व्यापक विजयाचा पाया घालण्यासाठी दुसऱ्या पक्षातून आलेल्या सक्षम नेतृत्वाला भाजपमध्ये संधीची कवाडे खुली असण्याचा संदेश ही द्यायचा होता आणि स्वाभाविकपणे येदुरप्पा यांच्यावरील अवलंबित्व सुद्धा कमी करून पक्षाला नवीन नेतृत्व विकसित करण्याची संधी साधायची होती.
त्यात प्रथमदर्शनी यशस्वी होताना सुद्धा दिसू लागले होते.परंतु लिंगायत समाजाचे पाठबळ व आपला जनाधार व्यापक करण्यात बोम्मई कमी पडत असल्याचे पक्ष नेतृत्वाला जाणवू लागले.येदुरप्पा यांच्या नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागल्यावर त्यांना संसदीय मंडळात घेणे निवडणुकीची जबाबदारी सोपविणे... मुलाच्या भवितव्याविषयी  नियोजन ...मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित न करणे.....हे केले गेले...त्यामुळेच नवीन नेतृत्वासाठी केलेली सर्व योजना फोल ठरली..आणि आगीतून उठून फुफाट्यात अशी भाजपची अवस्था झाली.

अयशस्वी प्रयत्न

मुलाच्या भवितव्याविषयी केंद्रीय नेतृत्वाशी केलेली चर्चा,पुन्हा दिलेले महत्व यामुळे झालेले नुकसान कमी होईल व येदुरप्पा सक्रिय झाल्यावर लिंगायत बहुल हक्काचे मतदारसंघ,मुस्लिम आरक्षण रद्द करून लिंगायत,वोक्कलिगा,SC -ST समाजाचे आरक्षण वाढविणे, ओल्ड म्हैसूर,व बेंगळुरू या वोक्कलीगा प्रभावक्षेत्रात ४२ वोक्कलिगा उमेदवार देणे,पंतप्रधान मोदी जी आणि अमितभाई शहा यांनी प्रभावक्षेत्रात लक्ष्य केंद्रित करणे अशा अनेक सकारात्मक गोष्टी केल्या गेल्या.पण या गोष्टी अपेक्षित परिणाम साधू शकल्या नाहीत.
या दरम्यानच उत्तर प्रदेश मध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 
योगी आदित्यनाथ, हिमांत बिसवा सरमा यांच्या अधिक सभा - रोड शो यांनी निश्चितच फरक पडला असता.

काँग्रेस वरचढ
काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री श्री. मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री श्री.सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष श्री. डी.के.शिवकुमार या त्रयींनी नियोजनबध्द प्रचार साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करीत भाजप पेक्षा वरचढ ठरले...यामध्ये भाजपने येदुरप्पा यांना अपमानित केले हा प्रचार यातून लिंगायत मतदारांना घातलेली भावनिक साद,नंदिनी अमुल वाद यातून कन्नड अस्मिता जागृत करणे, सिदधरामय्या यांनी आपल्या कुरुबा (धनगर) समाजाला आणि शिवकुमार यांनी मीच मुख्यमंत्री होणार हे आपल्या वोक्कलिगा समाजाला सांगणे हे अतिशय मोठा परिणाम साधून गेले. कारण जातीय अस्मिता ही खूप महत्त्वाची ठरते... यातच शेवटच्या टप्प्यात मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री होण्याचे आवाहन करणे  हे सुद्धा शिवकुमार यांनी जाणीवपूर्वक केले.याचा परिणाम म्हणजे आपल्याच समाजाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित दिसू लागल्यावर SC समाज,कुरूबा सह इतर ओबीसी समाज व वोक्कलिगा समाज मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडला...बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा गाजला पण आत्मविस्मृत हिंदु समाज जागा होण्याऐवजी मुस्लिम समाज एकवटून JDS च्या प्रभाव क्षेत्रात व संपूर्ण कर्नाटकमध्ये भाजप विरोधात मतदानासाठी बाहेर पडला.

भाजपची सद्गुण विकृती
राजकारणामध्ये भ्रष्टाचार,परिवारवादाला विरोध व नवीन नेतृत्वाला संधी या गोष्टी आदर्शवादासाठी योग्य पण व्यवहारात अजून अयोग्यच वाटू लागतात एवढे लोक याचे अधीन झाले आहेत.जातीय अस्मिता अधिक प्रभावी ठरतात.या आदर्शवादासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असे वाटते आहे..या आदर्शवादी धोरणामुळे प्रसंगी राजकीय नुकसान सोसावे लागले तरी बेहत्तर पण याची सुरूवात स्वतः पासून करतांना भाजपने येदुरप्पा, ईश्वराप्पा,जगदिश शेट्टर,लक्ष्मण सावदी अशा अनेकांची नाराजी पत्करली आणि जवळपास २४ आमदारांची उमेदवारी कापली व जवळपास ५५ नवीन उमेदवारांना संधी दिली.
यामुळे बंडखोरी,पक्षांतर, अंतर्गत नाराजी,महाराष्ट्र सोबतचा सीमावाद याचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर कर्नाटक येथे विशेष फटका बसला.
मध्य कर्नाटक येथे रेड्डी बंधूंचा पक्ष,खरगे यांचा प्रभावी प्रचार,
येदुरप्पा आपल्याच विभागात अडकून पडले याचा परिणाम सुद्धा महागात पडला.
हैद्राबाद कर्नाटक या तेलंगणाला लागून असलेल्या भागांमध्ये तेलंगणा मध्ये भाजपचा संभाव्य विजयरथ रोखण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांनी लावलेली अदृश्य अर्थपूर्ण ताकद यामुळे नुकसान झाले.

भाजप पार्टी विथ अ डिफ्रंस
मुळातच भाजप हा हायकमांड संस्कृती विरोधी पक्ष असल्याने स्थानिक नेतृत्व तयार करण्यावर भर असतो.पण बऱ्याचदा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्याचा पायंडा हा बहुतांश वेळा स्वयंगोल करून घेतो.
२००३ साली मध्यप्रदेश मध्ये उमा भारती व नंतर शिवराज सिंह चौहान,राजस्थानमध्ये वसुंधराराजे ,छत्तीसगड मध्ये रमण सिंह यांचे चेहरे घोषित केल्यानेच ४ पैकी तीन ठिकाणी सत्ता आली होती. गुजरात मध्ये नरेंद्रजी मोदी,हिमाचल मध्ये प्रेम कुमार धुमल,गोवा मध्ये स्व.मनोहर पर्रीकर ही काही उदाहरणे यशस्वी ठरली असतानासुद्धा भाजप का असे करतो कळायला मार्ग नाही.
स्थानिक नेतृत्व विरुध्द स्थानिक नेतृत्व अशीच लढाई अपेक्षित आहे.आणि असे योगी आदित्यनाथ,हिमांत बिसवा सरमा,पुष्करसिंह धामी, डॉ माणिक साहा,तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के.अण्णामलाई, तेलंगणा प्रदेशाध्यक्ष बांदी संजय कुमार यांच्यासारखे राष्ट्रवादी विचारांचे,हिंदुत्वनिष्ठ स्थानिक नेतृत्व पुढे आणणे ... त्यांना बळ देणे हे अत्यावश्यक बनले आहे.२०२४ चा विजयरथ चौफेर धावण्यासाठी ही पाऊले उचलणे क्रमप्राप्त आहे.
रविंद्र बाळासाहेब माने
संपर्क क्रमांक - 8788996058

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"